Pune Crime News | पतीला आईवडिल, पहिल्या मुलीपासून विभक्त होऊन आपल्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी दुसर्‍या पत्नीने केले वशीकरणाचे प्रयोग, खराडीतील धक्कादायक प्रकार आला समोर

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  तिचे त्याच्याबरोबरचे तिसरे लग्न, तर त्याचे दुसरे लग्न. दोघांचे एक मुलगा व मुलगी त्यांच्याबरोबर रहात होते. ड्रग्ज प्रकरणात महिलेचा मुलगा तुरुंगात गेल्याने ती माहेरी निघून गेली. तेव्हा आपल्याला आई वडिल आणि पहिल्या पत्नीच्या मुलीपासून तोडण्यासाठी पत्नी वशीकरण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत योगेश सतेंद्र धुत (वय ४७, रा. गेरा ट्रिनिटी टॉवर ग्रॅट रोड, खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांची
पत्नी तुलिका योगेश धुत (वय ४४, सध्या रा. सुंदरनगर, मालाड पूर्व) यांच्यावर जादुटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गेरा ट्रिनिटी टॉवर येथे २५ मे २०२० ते २१ नोव्हेबर २०२४ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश धुत यांनी तुलिका धुत हिच्याशी दुसरे लग्न केले आहे. तुलिका धुत यांचे हे तिसरे लग्न आहे. योगेश यांना पहिल्या पत्नीपासूनची एक मुलगी आहे. तर, तुलिका यांना अगोदरच्या लग्नातील एक मुलगा आहे. हे सर्व जण व योगेशचे आईवडिल एकत्र रहात होते. दरम्यान, त्यांच्यात वादावादी होत होती.  तुलिका धुत हिच्या मुलावर अंमली पदार्थ प्रकरणात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तुलिका हिच्या  मुलाला अटक केली. या प्रकारामुळे त्यांच्यामध्ये भांडणे होऊन तुलिका माहेरी निघून गेली.

दरम्यान, योगेश याला घरामध्ये तुलिका हिच्या काही डायर्‍या तसेच तिच्या कप्प्यामध्ये मिरच्या व इतर साहित्य मिळून आले. त्यांनी हे सर्व वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, आपली दुसरी पत्नी तुलिका ही योगेश याने मुलगी, आई वडिल यांच्यापासून विभक्त होण्यासाठी योगेशवर वशीकरण करत होती. योगेश व त्याच्या कुटुंबामध्ये भांडणे लावण्याच्या उद्देशाने ती कारस्थाने करत होती. योगेश याचे आई वडिल व मुलगी यांच्या मरण्यासाठी संकल्प करत होती, अशा प्रकारे ती अमानुष, अनिष्ट प्रथा व जादुटोणा अशी कृत्य करत असल्याचे आढळून आले. खराडी पोलिसांनी जादुटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करीत आहेत.

You may have missed