Pune Crime News | पुणे : कर्ज थकल्याने इडंसन्ड बँकेच्या रिकव्हरी एजंटांनी तरुणाला केली काठीने बेदम मारहाण, हडपसर पोलिसांनी तिघा रिकव्हरी एजंटांना केली अटक
पुणे : Pune Crime News | क्रेडिट कार्डाच्या कर्जाचे हफ्ते थकल्याने रिकव्हरीसाठी आलेल्या इडंसन्ड बँकेच्या रिकव्हरी एजंटाने कर्जदार तरुणाला अपमानास्पद शिवीगाळ करुन लाकडी काठीने मारहाण केली़ हडपसर पोलिसांनी या तिघा रिकव्हरी एजंटांना अटक केली आहे.
जय सुहास कासार Jay Suhas Kasar (वय २६, रा. घावटेनगर, मांजरी) विनित सुहास कासार Vinit Suhas Kasar (वय ३०, रा. घावटेनगर, मांजरी) आणि तनिष्क हरीष खुडे Tanishq Harish Khude (वय १९, रा. कोद्रेनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्या रिकव्हरी एजंटांची नावे आहेत. ही घटना हडपसरमधील १५ नंबर चौक येथे २७ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता घडली.
याबाबत फुरसुंगी येथे राहणार्या एका ३५ वर्षाच्या व्यवस्थापकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी इडंसन्ड बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले आहे. त्यावरील कर्जाचे हप्ते थकले होते. त्याच्या रिकव्हरीसाठी जय कासार व त्याचे दोन साथीदार फिर्यादी काम करीत असलेल्या सोसायटीत २७ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता आले. त्यांनी सर्वांसमोर तुमची बदनामी होईल, असे न बोलण्यासाठी त्यांच्याकडे कर्जापेक्षा वाढीव पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी त्याला नकार दिल्याने त्या तिघांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने व लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केले.
हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करीत आहेत.
