Pune Crime News | पुणे : कोथरूडमधील 17 वर्षीय मुलाच्या खुनाचा दोन तासांत छडा; दोन अल्पवयीन मित्र ताब्यात

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  कोथरूडमधील एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या १७ वर्षीय मुलाच्या खुनाचा कोथरूड पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावला. या प्रकरणात मृत मुलाचेच दोन अल्पवयीन मित्र सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, दोन्ही विधिसंघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत.

नील विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरूड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

१९ ऑगस्ट रोजी सकाळी कोथरूड येथील एआरएआय टेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात एक तरुण पडलेला दिसला. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी दाखल झाले.

सुरुवातीला मृत तरुणाची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस अंमलदार दत्ता सोनावणे यांना मृत तरुण हा कोथरूडमधील श्रावणधारा वसाहतीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याची ओळख नील नाईक अशी पटली आणि पोलिसांनी तपासाला वेग दिला.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच स्वतंत्र पथके तयार केली. गुप्त बातमीदार आणि इतर तांत्रिक व पारंपरिक तपास पद्धतींच्या मदतीने संशयितांचा शोध सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान नीलचा खून त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यापैकी एक संशयित त्याच्या राहत्या घरी, तर दुसरा मार्केटयार्ड परिसरात लपून बसल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांनाही काही वेळात ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही संशयित अल्पवयीन असल्याने त्यांच्याविरुद्ध बाल न्याय कायद्यानुसार पुढील प्रक्रिया केली जात आहे.

या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, घटनेचा सविस्तर तपास कोथरूड पोलिसांकडून सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील कारोळे करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, प्रभारी पोलीस उपआयुक्त  मिलींद मोहिते, पोलीस उपआयुक्त सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके , , पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल कारोटे, तपास पथक अधिकारी सपोनि सुधीर घुले, पोहवा दत्तात्रय सोनवणे, पोहवा राजेंद्र लांडगे, पोहवा श्रीकांत दगडे, पोहवा शकील पठाण, पोशि शिवप्रसाद दहिफळे, पो शि मयुर पांढरे, पो शि वैभव शितकाल, पोशि गणेश डोंगरे, पोशि ऋषीकेश कोळप, पोशि आकाश वाल्मिकी यांचे पथकाने केली आहे.

You may have missed