Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील दीड वर्षांपासून फरारी गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 7 च्या पथकाने जयसिंगपूरहून केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | खराडी परिसरात खंडणी उकळण्याच्या गुन्ह्यात मोक्का कारवाई केल्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने जयसिंगपूर येथून जेरबंद केले आहे.
सुनिल रवींद्र पाटील Sunil Ravindra Patil (वय ३०, रा. राजाराम पाटील नगर, खराडी, सध्या रा़ झोपडपट्टी शाहूनगर, ता. शिरोळ जि. कोल्हापूर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
खराडी पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी खंडणीची मागणी करुन दहशत निर्माण करणार्या विनित राजू देवकर याला पोलिसांनी गेल्या वर्षी पकडले होते. त्याच्यासह त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अंतर्गत कारवाई केली होती. गुन्हे शाखेच्या युनिट ७ कडील पोलीस अंमलदार किरण पलांडे यांना तांत्रिक माहितीवरुन यातील फरार आरोपी सुनिल पाटील हा जयसिंगपूर येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व त्यांचे सहकारी यांनी जयसिंगपूर येथे शोध घेत स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुनील पाटील याला जयसिंगपूर येथील दसरा चौकात सापळा रचून १९ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजता पकडले. पुढील कारवाईसाठी त्याला खराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार भरत उकीर्ड, सारंग दळे, विनायक साळवे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, निर्णय लांडे, अमोल ढोणे, विकास कदम, सुहास तांबेकर, किरण पलांडे, भरत गुंडवाड, नेहा तापकीर, प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.
