Pune Police – DJ Sound Testing | पुणे : दहीहंडी-गणेशोत्सवापूर्वी पोलिस आयुक्तालयात डीजे साउंड सिस्टिमची चाचणी; पोलीस आयुक्त्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत डेसिबल तपासणी (Video)

Pune Police - DJ Sound Testing | Pune: DJ sound system test at the Police Commissioner’s office before Dahi Handi-Ganeshotsav; decibel check in the presence of Police Commissioner Amitesh Kumar (Video)

पुणे : Pune Police – DJ Sound Testing | दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी चर्चेत येणाऱ्या डीजे साउंड सिस्टिमच्या आवाजाबाबत पुणे पोलिसांनी यंदा प्रत्यक्ष तांत्रिक तपासणीचा मार्ग अवलंबला आहे. गुरुवारी पुणे पोलिस आयुक्तालयात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत विविध डीजे साउंड सिस्टिमची चाचणी घेऊन त्यांची डेसिबल पातळी तपासण्यात आली.

https://www.instagram.com/p/DcQpYyuJnMV

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरात उत्सवाची तयारी वेगाने सुरू आहे. मात्र, गणेश मंडळांकडून मोठ्या साउंड सिस्टिमची मागणी, ध्वनीप्रदूषणाबाबत पोलिसांकडून लागू करण्यात येणारी कायदेशीर मर्यादा आणि नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केलेल्या तक्रारी यामुळे डीजेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

यंदा DJ साउंड सिस्टिमवर निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने काही गणेश मंडळांनी आक्षेप नोंदवला आहे. दुसरीकडे, प्रचंड आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन कठोर कारवाईची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी थेट आयुक्तालयात विविध प्रकारच्या साउंड सिस्टिम प्रत्यक्ष चालवून त्यांची क्षमता आणि आवाजाची तीव्रता मोजली.

या चाचणीवेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, वरिष्ठ पोलीस अधिकारी, तसेच पुणे साउंड असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमजानी आणि संघटनेचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

डेसिबल मॉनिटर मशीनच्या मदतीने वेगवेगळ्या साउंड कॉम्बिनेशनची आवाजाची पातळी तपासण्यात आली. ‘2 बेस-2 टॉप’ आणि ‘4 बेस-4 टॉप’ अशा साउंड सेटअपमुळे आवाजात किती वाढ होते, याचाही अभ्यास करण्यात आला. तसेच काही स्पीकर बॉक्समध्ये अनधिकृतपणे बसवण्यात येणाऱ्या ‘प्रेशर मिड’ या उपकरणाबाबतही पोलिसांनी माहिती घेतली.

विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांनी सांगितले की, पर्यावरण कायदा आणि ध्वनीप्रदूषण नियंत्रणासंदर्भातील निर्धारित डेसिबल मर्यादांचे आगामी उत्सवांमध्ये पालन व्हावे, या उद्देशाने ही ट्रायल घेण्यात आली. साउंड सिस्टिमचे विविध प्रकार आणि त्यामध्ये केले जाणारे कस्टमायझेशन तपासण्यात आले असून, याबाबत सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

पुणे साउंड असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमजानी यांनीही वाढत्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे मान्य केले. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकारच्या उपकरणांमुळे हा त्रास वाढतो, हे स्पष्ट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

रमजानी यांनी ‘प्रेशर मिड’ या उपकरणाला संघटनेचा तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट केले. हे उपकरण स्पीकर बॉक्समध्ये बसवल्यानंतर मूळ क्षमतेपेक्षा अधिक तीव्र आणि त्रासदायक आवाज निर्माण होतो, असा त्यांचा दावा आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच उत्सव साजरा करावा आणि प्रामाणिक साउंड व्यावसायिकांनी अशा उपकरणांचा वापर करू नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

आता या तांत्रिक चाचणीनंतर पुणे पोलिस डीजे साउंड सिस्टिमसाठी कोणती अंतिम नियमावली आणि मर्यादा निश्चित करतात, याकडे गणेश मंडळे, साउंड व्यावसायिक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

You may have missed