Basav Jayanti | पुणे महानगरपालिकेत महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
पुणे: Basav Jayanti | विश्वगुरू जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८९३ वी जयंती पुणे महानगरपालिकेत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर आणि बसव सेवा प्रतिष्ठान, पुणे चे पदाधिकारी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना उपमहापौर वाडेकर यांनी बसवेश्वरांचा ‘कायकवे कैलास’ हा विचार समाजाला आजही दिशादर्शक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला महापालिका कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “महात्मा बसवेश्वर महाराज की जय” च्या घोषणांनी महापालिका परिसर भक्तीमय झाला होता. बसव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने यावेळी विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली.
दासोह सेवा
बसव सेवा प्रतिष्ठान तर्फे बाजीराव रोड येथील विश्वगुरू महात्मा बसवण्णा पुतळा येथे नागरिकांना मठ्ठा वितरित करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण वर्ष भर सामाजिक उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबीर, प्रबोधनपर व्याख्याने, अन्न दासोह, घर तिथे अनुभव मंटप, बाजीराव रोड येथील महात्मा पुतळा येथे दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी सायंकाळी मासिक अनुभव मंटप अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतात.
