Pune Crime News | पैसे चोरल्याच्या आरोपावरुन अ‍ॅकडमीतून काढून टाकणार असल्याचे सांगितल्याने 16 वर्षाच्या मुलाने गळफास घेत संपवले जीवन, यशोतेज अ‍ॅकेडमीचे संस्थापक, संचालक व सीईओ, वॉर्डनवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  एनडीएसाठी प्रशिक्षण देणार्‍या संस्थेतील मुलावर ३ हजार रुपये चोरल्याचा आरोप झाला. त्यातून अ‍ॅकेडमीतून काढून टाकणार असल्याचे सांगितल्याने नैराश्येत जाऊन तरुणाने आपल्या रुममध्ये गळफास घेत जीवन संपविले. फुरसुंगी पोलिसांनी यशोतेज अ‍ॅकेडमीच्या संस्थापक, संचालक, सीईओ व वॉडर्नवर गुन्हा दाखल केला आहे.

अवधुत उल्हास बडे (वय १६, रा. बीड) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील उल्हास म्हातारदेव बडे (वय ५४, रा. माऊली निवास आनंदनगर, बीड) यांनी फुरसुंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तेजस पद्याकर पाटील Tejas Padmakar Patil (वय ३२, रा. गमन उन्नती टॉवर्स, कात्रज -कोंढवा रोड), विकास सुरेश पाटील Vikas Suresh Patil (वय ३२, रा. यशोतेज अ‍ॅकेडमी, हांडेवाडी), वार्डन वसंत तुकाराम सरकटे Vasant Tukaram Sarkate (वय ५५, रा. यशोतेज अ‍ॅकेडमी, हांडेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हांडेवाडी येथील यशोतेज अ‍ॅकेडमी येथील खोलीमध्ये १० नोव्हेबर २०२५ रोजी घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोतेज अ‍ॅकेडमीमध्ये एनडीए प्रवेश परिक्षेची तयारी मुलांकडून करुन घेतली जाते. ही निवास अ‍ॅकेडमी आहे. अवधूत बडे हा अकरावीत शिकत होता. निवास स्कूलमध्ये तो रहात होता. त्याच्या रुमपार्टनरचे साडेतीन हजार रुपये चोरल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. वॉर्डन वसंत सरकटे याने तुला अ‍ॅकेडमीमधून रस्टीकेट केले जाणार असे सांगितले. त्यामुळे तो नैराश्यात गेला. त्यातून त्याने १० नोव्हेंबर २०२५ रोजी आपले जीवन संपविले. अकस्मात मृत्यु चा तपास फुरसुंगी पोलिसांनी केला. अ‍ॅकेडमीच्या संचालकांनी चोरीच्या आरोपीची बाब मुलाच्या नातेवाईकांना सांगितली नाही. मुलास योग्य समुपदेशकामार्फतीने समुपदेशन केलेले नाही. यशोतेज अ‍ॅकेडमीचे संस्थापक संचालक व सीईओ यांनी त्यांच्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने त्यांच्या निष्काळजीपणामुळे व कामामध्ये हयगय केल्याने फिर्यादीचा मुलगा अवधूत बडे हा नैराश्यातून बाहेर आला नाही. त्याला योग्य समुपदेशन न मिळाल्याने तो नैराश्यात जाऊन त्याने यशोतेज अ‍ॅकेडमीमधील निवासी रुममध्ये सिलिंग फॅनला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. पोलीस उपनिरीक्षक शंभुराज जाधव तपास करीत आहेत.

You may have missed